Wednesday, February 7, 2024

                                     प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण......                

                                         -------- अमोल वाघमारे    



जगण्या-मरण्याचे अनादीचक्र आणि अथांग असा जीवन प्रवास.....! जगाच्या कोलाहलात स्वतःशी संवाद साधणं किती अवघड होऊन बसलंय ! पण अशातही कधी कधी असं होऊन जातं की अक्षरेच जिवंत होऊन स्वतःशी खंडित झालेला हा संवाद पुन्हा सुरू करतात. हा संवाद सुरू असताना अनेकदा जगण्यातील आश्वासकता हीच एक फसवा आभास आहे की काय असे वाटून जाते माणसाच्या जन्माची जगण्याची निगडित असे सगळेच विषय कवीच्या चिंतनाचे आणि लेखनाचे विषय बनतात. प्रख्यात लकार इलाही जमादार यांनी एकाकीपण म्हणजे काय आहे याविषयी आपल्या झलेतून नेमकेपणाने भाष्य केले आहे.

 

         प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण

         निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण

 

मनाचे तरंग उघडत जायचे तर जीवनातील उलटफेर सुद्धा अभ्यासणे गरजेचे असते मनावर उमटलेल्या स्मृतींच्या पायखुणांची रेखांकने ही एकाकीपणाच्या अवस्थेत अधिक गडद उठावदार होऊ लातात.

 

        पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता

        कसे थोपवू उल्के सम हे कोसळणारे एकाकीपण

 

खालील झिब्रान म्हणतो की नदीचा प्रवाह जसा ओंडक्यांना एकत्र आणतो तसाच वेगळेही करतो त्याचप्रमाणे माणसेही जीवनाच्या प्रवाहामुळे एकत्र येतात आणि याच जीवन प्रवाहाच्या एका लाटेसोबत विखुरली ही जातात. एकाकीपण ही संकल्पना देखील माणसा इतकी सनातन आणि आदिम आहे.

 

        अशी कशी रे तुझी सावली माझ्यावरती पडली सूर्या

        तुझ्यासारखे माझ्यासोबत वावरणारे एकाकीपण

विरह आणि व्यथा ही प्रत्येक प्रेमाची परिमिती असेलच असे नाही, पण ती काही वेळा प्रेमाच्या नशिबी येते. व्यवहार हा जगाचा नियम आहे. जी माणसं कधीकाळी आपल्या ओळखीची असतात ती काही काळानंतर अनोळखी वाटू लागतात जेव्हा ती अनोळखी वाटू लागतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसणारी तटस्थता ही वास्तव असते की दृष्टीभ्रम?

 

         कधीतरी तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसांप्रमाणे

         दिसेना मीुझं दिसेल का पण गोठविणारे एकाकीपण

 

माणसासाठी शोधा नवा नाही ..... कशाचा कशाचा शोध...... त्यासाठी चाललेला जीवन प्रवास......! सोबतीला एकाकीपण असेल तर हा प्रवास कदाचित शांततेच्या शोधासाठी ही असू शकतो...... अश्वत्थाम्यासारखा क्लेशदायक !

 

           अश्वत्थाम्या अशी कोणती जखम तुझी तहहयात होती

            माझ्या माथी सदैव आहे भडभळणारे एकाकीपण

 

दिवस आणि रात्र, पुनव आणि अवस यामधील फरक संपतो.... केवळ सोबत उरतो एकाकीपणा.......आणि तो ही जशी रात किड्यांची किर्रकिर्र सदोदित आणि अविश्रांत सुरू असते तितक्यात सातत्याने ! इलाहींनी या गझले मध्ये अतिशय परिणामकारक प्रतिमांचा वापर केल्याचे आपल्याला दिसून येते.

 

            दिवस कशाचा अवस असावी किरण कवडसा काही नाही

            जंगलातल्या रात किड्यांसम किरकिरणारे एकाकीपण

 

प्रभावी आणि नेमकेपणाने केलेले शब्दयोजन, लेखनातील सहजता आणि तंत्र व आशय यांनी समृद्ध असलेली ही गझल आहे. ही गझल मात्रा वृत्तात आहे. तंत्र आणि आशय यांनी परिपूर्ण असलेल्या अनेक गझल लिहून इलाही जमादार यांनी मराठी गझलचे दालन समृद्ध केले आहे.

             हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचवलेच पण

             सांग शंकरा पचवशील का जळजळणारे एकाकीपण

 

पौराणिक प्रतिमा आणि उदाहरणांचा समावेश असलेले काही शेर सुद्धा या गझले मध्ये समाविष्ट केलेले आहेत 'एकाकीपण' हे कदाचित हलाहला पेक्षा दाहक असावे...... किंबहुना, प्रत्यक्ष शंकराला तरी ते पचविता येईल का ? असा प्रश्न उपस्थित करून कवीने एकाकीपणाची तीव्रता अधोरेखित केलेली आहे.  

 

                             


पूर्व प्रकाशन : दैनिक गावकरी 

   दिनांक : 04/01/2009