बदीउज्जमान खावर यांची गझल
मराठीमध्ये बदीउज्जमान खावर हे एक महत्वाचे गझलकार मानले जातात.
'खावर' हा तखल्लुस (अर्थात कवीचे टोपण नाव) वापरून गझल लिहिणाऱ्या या कवीने मराठी गझलेला एका ठराविक साचेबद्धतेच्या पलीकडे घेऊन जाण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. सशक्त काव्यनिर्मिती करून त्यांनी मराठी गझलेच्या परिभाषांना व्यापकत्व देण्याचा आणि मराठी गझलेचे आकाश विस्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
"तो रंग नाही राहिला, तो वास नाही राहिला
बागेत कोठेही आता मधुमास नाही राहिला
नव्हतीस तू येथे तुझा आभास तेंव्हा व्हायचा
आलीस तू आता तुझा आभास नाही राहिला
कुठलेच माझे बोलणे मानीत नाही मी खरे
माझ्यावरी माझा आता विश्वास नाही राहिला
शोधू अता 'खावर' मला मी कोणत्या ग्रंथामधे
बखरीतल्या गप्पांमधे इतिहास नाही राहिला “
खावर यांनी गझलेचे तंत्र चांगल्या प्रकारे सांभाळले आहे.आशयाभिव्यक्ती सहजतेने व प्रभावीपणाने झाली आहे. खावर यांच्या गझलांमध्ये तांत्रिक निकषांच्या परिपूर्तीसाठी आशयाभिव्यक्तीमध्ये तडजोड केलेली कुठेही दिसत नाही. विषयवैविध्य देखील चांगल्याप्रकारे असल्याचे दिसून येते.
“ कुणी गर्दीत या दु:खी जराही व्हायचे नाही
हरवलो मी तरी कोणी मला शोधायचे नाही
तुझ्या गठडीत राहू दे तुझे आदर्श हे सारे
तुझ्या मुलुखातले नाणे इथे चालायचे नाही
कशी संपेल ऐशाने तुझी-माझी लढाई ही
तुला हारायचे नाही, मला जिंकायचे नाही
असे हे रान जादूचे इथे आल्यावरी 'खावर'
कुणाला रान हे सोडून जाता यायचे नाही “
हजार दु:खे मनात माझ्या, हजार जखमा उरात माझ्या
वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या
तुझ्याविनाही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे
असे खरा रंग जीवनाचा तुझ्यामुळे जीवनात माझ्या
समोर मृत्यू उभा तरीही नसे तुझे वेड सोडले मी
तुझीच गाणी अजून असती थरारणाऱ्या स्वरात माझ्या
गरीब मी दान तारकांचे कुठून या काजळीस देऊ?
उगीच 'खावर' उभी असे ही निशा अशी अंगणात माझ्या
गझल ही जशी प्रेमाराधाना,सौंदर्याचा शृंगार,शृंगाराचे सौंदर्य आहे,तशीच ती वेदनांचा
देखील शृंगार आहे. म्हणूनच वेदनांच्या सौंदर्याचा शोध हा गझलेचा एक पैलू आहे.
ज्याला वेदनेचे सौंदर्य उमगले,त्याला वेदना उमगली आणि ज्याला वेदना उमगली त्याला
गझल उमगली.
रोशनीचे कायदे पाळायचे
रात्र आली कि दिवे जाळायचे
रक्त डोळ्यातून नाही येत का?
सारखे अश्रू किती ढाळायचे
राहिली ही दोन शब्दांची कथा
काय आता यातले गाळायचे
खूप झाली पुस्तके 'खावर' अता
माणसांचे चेहरे चाळायचे
काव्यातील संपृक्तता ही कोणतीही काव्यनिर्मिती सशक्त होण्यासाठी गरजेचे असते.
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणे, हे गझलेची परिणामकारकता
वाढवण्यासाठी आवश्यक असते. शिवाय गझलेतील प्रत्येक शेर चांगला कसा होईल, याकडे लक्ष द्यावे लागते. अचूक शब्दयोजनामुळे आशय नेमकेपणाने
व्यक्त होतो. त्यामुळे शेर प्रभावी बनतो. तसेच तंत्राची योग्य परिपूर्ती करण्यासाठी देखील शब्दयोजन योग्य असणे गरजेचे असते. गझलेचा एखादा शेर जरी ऐकवला तरी तो एकाच शेर एखाद्या स्वतंत्र कवितेचा प्रत्यय देणारा वाटतो.
निर्झरांनी टाकले नि प्यास जेव्हा वाढली
आसवे 'खावर' मला माझी गिळावी लागली
खावर यांच्या गझल लेखनामध्ये गैरमुसलसिल गझलांचे प्रमाण अधिक आहे. या प्रकारामध्ये विविध विषय असलेले शेर एकाच गझलेमध्ये समाविष्ट केलेले असतात. त्यामुळे गझलेचे सौंदर्य वाढते आणि ती एक वैशिष्ट्यपूर्ण काव्याविष्कार बनते.
सिद्धार्थही न झालो, मी बुद्ध ही न झालो
सोडून राजवाडा नाहक वनात आलो
माझ्याविरुद्ध खावर फिर्याद मीच केली
घेवून मीच मजला न्यायालयात आलो
२७ सप्टेंबर १९९० रोजी हा जिवंत मनाचा कवी-गझलकार कालवश झाला.बदीउज्जमान 'खावर' यांचे निधन होऊन वीस वर्षे होऊन गेली तरी त्यांच्या गझलेतील ताजेपणा
तसाच कायम आहे. खावर यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. त्यांच्या 'गझलात रंग माझा (१९८५),
'माझिया गझला मराठी'(१९८६),'चार माझी अक्षरे'(१९९८),या तीन गझलसंग्रहांशिवाय
'खावर' या नावाचा त्यांच्या समग्र मराठी गझलांचा संग्रह 'गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई'
यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेला आहे. याशिवाय ‘हुरुफ'(१९७२),
'मेरा वतन हिंदोस्ताँ'(१९७३), 'बयाज'(१९७३), 'अमराई'(१९७६), 'लफ्जों की पैरहन'(१९७७),'सात समंदर'(१९८२), 'नन्ही किताब'(१९८३),'मोती-फूल-सितारे'(१९८४), 'सब्जों ताजा निहालों के अंबोह मे' (१९८६) हे उर्दू कवितासंग्रह प्रकाशित आहेत. या व्यतिरिक्त
त्यांनी मराठी कवितांचा उर्दूमध्ये अनुवादही केला आहे. त्यात 'खुशबू',(१९७४),'सबील' (१९७८), 'मराठी रंग'(१९८५),'दिनार'(१९८१),'निले पहाड की नज्मे'(१९८६) इत्यादी पुस्तकांचा समावेश
आहे. 'खावर' यांच्या साहित्यसेवेला 'इम्तियाझे मीर सनद' या उर्दूतील मोठ्या पुरस्कारासह
भारत सरकार,महाराष्ट्र सरकार आणि इतर तब्बल १४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी मराठी कथांचा उर्दूत आणि उर्दू कथांचा मराठीत अनुवाद देखील केला आहे.
--------------adv. amol waghmare