Wednesday, October 14, 2015

 

                        इलाही जमादार यांची गझल

मराठी भाषेत गझल या काव्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यात स्व.सुरेश भट यांच्यानंतर ज्यांनी महत्वाचे  योगदान दिले आहे त्यामध्ये इलाही जमादार हे देखील एक  प्रमुख नाव   आहे. गझल,रूबाई,कतआ (मुक्तक),दोहे, मुक्तछंद,गीते,मीरेच्या विराण्या आणि भजनांचा विश्लेषणात्मक काव्यानुवाद ('मला उमगलेली मीरा') अशा विविध पैलूंनी सजून त्यांची कविता रसिकांच्या सन्मुख आली आहे.

                      गझलेचा अभ्यास करताना किंवा त्यावर  विवेचन करताना तीन बाबींकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.एक म्हणजे तांत्रिक निकषांची परिपूर्ती होते अथवा नाही, दुसरे म्हणजे शयाभिव्यक्ती कशाप्रकारे झाली आहे,आणि तिसरी आणि महत्वाची बाब अशी की गझलकाराने काही नवीन प्रयोग केले आहेत काय अर्थात गझलकार प्रयोगशील आहे अथवा नाही, हे देखील पाहणे गरजेचे असते.   

 

                     गझलेमध्ये तांत्रिक निकष पाळणे अनिवार्य आहे. गझलेमध्ये तांत्रिक निकष पाळणे अनिवार्य आहे. त्यामुळे तंत्र  हा गझलेचा एक अविभाज्य भाग आहे; परंतु आशयाभिव्यक्तीला देखील तेवढेच महत्व आहे. म्हणूनच तंत्र हा गझलेचा आत्मा असला तरी आशय हा गझलेसह कोणत्याही काव्यप्रकाराचा आत्मा असतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. इलाही जमादार यांची गझल तांत्रिक निकषांवर तर उतरतेच,पण त्याचबरोबर आशय सौंदर्याने देखील समृद्ध आहे. म्हणूनच  इलाहींसारख्या  काही मोजक्याच गझलकारांनी मराठी गझलेचे सत्व, स्वत्व आणि स्वाभाविकत्व जपले आहे.

        इलाही जमादार यांच्या गझलेवर भाष्य करताना त्यांच्या 'जखमा अशा सुगंधी','भावनांची वादळे','अर्घ्य','सखये','मोगरा','तुझे मौन' या गझलसंग्रहाच्या अनुषंगाने विचार होणे गरजेचे आहे. 

           'जखमा अशा सुगंधी'या गझलसंग्रहातील गझल ही उर्दू गझलेच्या सर्व स्वाभाविक वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर आली. हा त्यांचा पहिलाच गझलसंग्रह लोकप्रिय तर झालाच;शिवाय समीक्षकांच्या प्रशंसेसही  पात्र  ठरला.  दु:खांचे मोरपिसारे शब्दातून वेचत असतानाच मानवी आयुष्याचे विविध तरंग इलाहींच्या लेखणीतून अतिशय नजाकतीने शब्दबद्ध झाल्याचे दिसून येते.  

 

                  अंदाज आरशाचा वाटे खरा असावा

                  बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

        

                  जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला

                  केलेत घाव ज्याने तो मोगरा असावा

 

                  काठावर उतरली स्वप्ने तहानलेली   

                  डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा   

 

                  माथ्यावरी  नभाचे ओझे सदा इलाही

                  दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा                       

 

 'तखल्लुस' म्हणजे कवीचे टोपणनाव गझलेच्या शेवटच्या शेर मध्ये वापरण्याचा प्रघात आहे. यावरून गझलेची मालकी अथवा मक्तेदारी कोणाकडे आहे ते कळते.जर शेवटच्या शेरमध्ये तखल्लुस असेल तर त्याला मक्ता असे म्हणतात. मराठीमध्ये पहिल्यांदा तखल्लुसचा  वापर ज्या गझलकारांनी सुरु केला त्यापैकी इलाही हे एक होत. नेमक्या शब्दात नेमकेपणाने परिणाम साधणे,हे गझलेमध्य आवश्यक असते. यासाठी शब्दयोजन अचूक असावे लागते. अचूक शब्दयोजन,आशय सौंदर्य आणि तांत्रिकतेच्या सर्व निकषांवर उतरणारी इलाही जमादार यांची गझल वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेदनेच्या हुंकाराचे प्रकटन इलाहींच्या गझलेमध्ये अधिक गहिरेपणाने आढळते.   

 

                   हे असे बागेवरी उपकार केले.

                   कत्तली करुनी फुलांचे हार केले

 

                   ठेवुनी शाबूत काया वार केले

                   फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले

 

                    ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा

                    पाडुनी भिंती घराच्या दार केले

 

                    पाहुनी तुजला चितेवरती 'इलाही'

                    तारकांनी अंबरी जोहार केले

        

'भावनांची वादळे'हा कवीचा दुसरा गझल संग्रह. आशय आणि तंत्र यांचा सुरेख समन्वय या गझल संग्रहात देखील आढळून येतो.माणूस,माणूसपण,आणि माणसाच्या जगण्याशी निगडीत असे सगळे विषय हे कवीचे लेखनविषय आहेत.गझलेतील प्रत्येक शेर हा स्वतंत्र  कवितेचा प्रत्यय देत असल्यामुळे गझलेला 'कवितांची कविता'असे म्हटले जाते.त्यामुळे विषयवैविध्याला गझलेमध्ये खूप महत्व असते. इलाहींच्या गझलेमधील विषयवैविध्य लक्षणीय आहे.

 

                     तुझी वंचना साधना होत आहे

                     तुलाही अता वेदना होत आहे                                    

                     पुन्हा मेघ आलेत आश्वासनाला

                     पुन्हा एकदा गर्जना होत आहे

 

                     जशी ओहटी लागली आसवांना

                     मनाचा किनारा सुना होत आहे

 

                     जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू

                     दुरावा इलाही गुन्हा होत आहे    

 

 'अर्घ्य' या इलाहींच्या तिसऱ्या गझल संग्रहामध्ये मात्रा वृत्तातील अनेक गझलांचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे.गझल ही फक्त अक्षरगण वृत्तातच लिहिली जावू शकते असा गझलकार व समीक्षकांचा समज होता.मात्रा वृत्तात लिहिल्याने गझलेचा गोडवा कमी होईल, असे कारण त्यामागे दिले जाई.मात्र नंतरच्या काळात काही गझलकारांनी मात्रा वृत्तात गझल लिहून मराठी गझलेचे आकाश अधिक विस्तीर्ण केले. मात्रा आणि अक्षरगण या दोन्ही प्रकारच्या वृत्तांमधून लिहिलेल्या अत्यंत कसदार व प्रगल्भ गझल 'अर्घ्य'मधून वाचकांच्या भेटीस आल्या आहेत.

 

                     प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण

                     निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण   

 

                      पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता

                      कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण       

           

                      कधीतरी तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसाप्रमाणे

                  दिसेन मी पण दिसेल का तुज गोठविणारे एकाकीपण           

 

                       हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचाविलेस पण

                       सांग शंकरा पचवशील  का गोठविणारे एकाकीपण 

 

  भावफुलांची  मुक्त उधळण करीत स्वप्नांचे परीजाती बहर 'सखये' या इलाहींच्या चौथ्या गझलसंग्रहामधून वाचकांसमोर येतात आणि त्यासोबतच व्यथा-वेदना गुलमोहारासाराख्या सजून,मनभावन होऊन शब्दात उतरतात. शब्दा-शब्दांतून वेदनेचा मूक स्वर उलगडत इलाहींची गझल वाचकांच्या मनापर्यंत जावून पोचते. या गझल संग्रहाचे वैशिष्ट्य असे की यातील बहुतांश  गझलांसाठी 'सखये' हा एकच रदीफ घेण्यात आला आहे,अर्थात बहुतांश गझल हमरादीफ  आहेत.    

                         खरे तर काव्य हे कवीचे स्वान्तसुख असतेपण या काव्यातून येणारी वेदना ही कवीची एकट्याची वेदना नसते. कवीची वेदना ही वैश्विक वेदना असते. समाजाच्या वेदनेचे ते एक प्रातिनिधिक रूप असते. म्हणूनच कवी जेंव्हा आपल्या सुख-दु:खांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत असतो,तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक प्रवाहासोबत सुख-दु:खांची बदलत जाणारी नवनवीन रूपे आपल्या समोर येत असतात. सुखासोबातच दु:खावरही प्रेम करण्याची उदात्त भावना ही गझलेच्या स्वाभाविकतांपैकी एक आहे. इलाहींसारखा संवेदनशील मनाचा कवी जेंव्हा गझल लिहू लागतोतेंव्हा गझल ही एखाद्या फुलपाखरासारखी भासू लागते. या पुस्तकात से-मिसरी अर्थात तीन ओळींचा शेर असलेल्या काही गझल समाविष्ट केलेल्या आहेत.     

       

                          तुझ्या वेदनांची फुले वेचते

                          कहाणी तुझी लोचनी वाचते

                          गझल बोलते मी गझल बोलते     

 

                           तुझ्या आसवांचीच मी वैखरी

                           मुक्या हुंदाक्याचीच मी बासुरी

                           हृदय मी तुझ्या स्पंदनी राहते        

 

  मोगरा हा इलाहींचा आणखी एक गझल संग्रह. वाचलेले, ऐकलेले, पाहिलेले तसेच जीवनाच्या अभ्यासातून आलेले विषय, व्यक्त,अव्यक्त भावभावना इत्यादी विचार शृंखलांच्या  माध्यमातून संश्लेषित होऊन सुसूत्रपणे व्यक्त होत असतात;म्हणून कवींच्या आयुष्याचे सामान्य माणसाच्या आयुष्याप्रमाणे कापरासारखे संप्लवन होत नसते.विचारसंश्लेषणाच्या माध्यमातून काव्य निर्मिती अशी एक अकृत्रिम निर्मितीप्रक्रिया कवींच्या मनात सुरु असते.  चांगल्या कविंबाबतची ही निरीक्षणे इलाहींच्या बाबतीतही गैरलागू ठरत नाहीत.

 

                     दिशाहीन एकटे भटकणे प्राक्तन बनले

                     एकांताशी बोलत बसने प्राक्तन बनले 

 

                     कॅमेऱ्यातील रोल संपला, हौस संपली

                     जुन्या स्मृतींचा अल्बम बघणे प्राक्तन बनले    

 

                     वाळूवरती तीच अक्षरे गिरवत बसतो

                     लिहिणे-पुसणे....पुसणे-लिहिणे प्राक्तन बनले

                 

                     श्वासांइतकी कठोर शिक्षा दुसरी नाही

                     पाषाणासम निर्जीव जगणे प्राक्तन बनले

 

आशय आणि तंत्र यांच्या दृष्टीने परिपूर्ण गझल कशी असावी,याचे आदर्श उदाहरण म्हणून नव्या गझलकारांनी इलाही जमादार यांची गझल अभ्यासणे गरजेचे आहे.

       'तुझे मौन' ही कवीची पाचशे पेक्षा जास्त शेर असलेली एकच गझल पुस्तक रूपाने आलेली आहे.या व्यतिरिक्त कवीचे ओअसीस हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून निरागस आणि आभास हे गझलसंग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

                                                                        (पूर्वप्रकाशन-साक्षात जाने-फेब्रु-मार्च २०१०)

                                                                                          ---Adv.Amol Waghmare