संगीता जोशी यांची गझल: -adv. amol waghmare
मराठी भाषेमध्ये केवळ चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध गझल लेखनाला सुरवात झाली.मूलतः अरबी भाषेतील हा प्रकार नंतर फार्सीत, त्यानंतर उर्दू व हिंदीत आणि त्यानंतर मराठीत आला.अरबी, फार्सी,उर्दू,हिंदी,मराठी असा या काव्यप्रकाराचा प्रवास होत असतानाच प्रत्येक भाषेने त्यावर स्वतःचे संस्कार केले.प्रत्येक भाषेचा सुगंध या काव्यप्रकारामध्ये तितक्याच सहजतेने आणि समर्थपणे दरवळला.मराठी भाषेमध्ये वर नमूद केलेल्या इतर भाषांच्या तुलनेत फारच कमी काळापासून गझललेखन होत आहे.त्यामुळे सशक्त गझल लिहू शकणाऱ्या गझलकारांची संख्याही कमी आहे.अशांमध्येही गझल लेखनामध्ये स्वतःचा ठसा उमटवू शकणाऱ्या गझलकारांची संख्या फारच कमी आहे. मराठी मध्ये जे मोजके गझलकार गझल लेखनामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत,त्यापैकी एक म्हणजे संगीता जोशी!
स्व.सुरेश भटांनंतरच्या पिढीतील गझलकार असूनही त्यांच्या गझलेची अथवा शैलीची छाप संगीता जोशी यांच्या शैलीवर दिसत नाही.उर्दू गझलेच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह त्यांची गझल रसिक-वाचकांच्या भेटीस येते.संगीता जोशींच्या शब्दांना एक अंगीभूत लय आहे.याशिवाय गझलेचे तंत्र देखील त्यांनी काटेकोरपणे पाळलेले आहेत आणि सर्व तांत्रिक निकष सांभाळून देखील अभिव्यक्ती मधील सहजता लक्षात घेण्यासारखी आहे.
फुले म्लान झाली कुणा काय त्याचे
धुळीला मिळाली,कुणा काय त्याचे
घरांचा जीवांचा तिने घास केला
अशी लाट आली कुणा काय त्याचे
गळी शैशावाच्या भुकेचेच ओझे
झुके ते अकाली कुणा काय त्याचे
इथे भ्रष्ट आचार त्याला प्रतिष्ठा
गुणांना न वाली कुणा काय त्याचे
रदीफ आणि काफिया ही गझलेची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत; पण काफिया ही जशी गझलेची अनिवार्यता आहे तसे रदीफच्या बाबतीत नाही. गझलेमध्ये रादिफचा वापर करणे हे गझलकाराच्या इच्छेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेक गझलकार काफियाने शेवट होणारी गझल लिहिताना दिसतात.या प्रकारच्या गझलेला 'गैर - मुरद्दफ़ गझल ' असे म्हणतात.अशा प्रकारची गझल मराठीत देखील मोठ्या प्रमाणावर लिहिली जात आहे.
ह्रस्वांत काफियाचे शेवटचे अक्षर ह्रस्व असते. त्यामुळे अशा प्रकारचा काफिया निभावणे फार अवघड असते.याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या
गझलेमध्ये प्रत्येक शेरचे शेवटचे अक्षर हे ह्रस्व असते. त्यामुळे या काफियाने पूर्ण होणारी गझल लिहिणे हे
एक आव्हानच असते.म्हणून तांत्रिक निकषांची परिपूर्ती करत प्रभावी शेर लिहिणे अवघड बनते. अशा वेळी गझलकाराने आशयाभिव्याक्तीच्या बाबतीत तडजोड केली, तर गझल प्रभावहीन बनते. थोडक्यात काय तर ह्रस्वांत काफियाने पूर्ण होणारी गझल लिहिणे हे एक आव्हान असते.मराठीत ह्रस्वांत काफियाची
गझल ज्या काही मोजक्या गझलकारांनी सशक्तपणे लिहिली आहे,त्यापैकी संगीता जोशी या एक होत.
अजुनी ती जखम जुनी वाहतेच....
हृदयाला सुख सुद्धा जाळतेच....
जग सारे दाबके आहे गढूळ
चिखलाचे शिंतोडे उडवतेच...
उपयोगी नसते क्षमताच फक्त
पहिला क्रम मिळविती कासवेच...
छोटी बहर अर्थात लहान वृत्तात कवयित्रीने अतिशय ताकदीने गझल लिहिल्या आहेत. या प्रकारामध्ये शब्दमर्यादा कमी असते. त्यामुळे कमीतकमी शब्दात जास्तीत-जास्त आशय व्यक्त करावा लागतो. तसेच वृत्त देखील योग्य प्रकारे सांभाळावे लागते. त्यामुळे शब्दातील अचूकता ही गझलेची परिणामकारकता वाढवते.
आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे
हे दु:ख नेहमीचे
होते तसेच आहे
बोलू घरी कुणाशी
ते ही सुनेच आहे
तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे
संगीता जोशी यांच्या गझलेमधून स्त्री जाणिवेचे यथार्थ चित्रण आले आहे.त्यांच्या गझलेतील विषयवैविध्य लक्षणीय असून विषयमांडणी अतिशय कौशल्यपूर्वक केली असल्याचे दिसून येते. स्त्रीमनाच्या भावना आणि वेदनाही त्यांच्या गझलेतून आक्रामकतेने नाही, तर स्वाभाविकतेने व्यक्त होतात.याशिवाय अभिव्यक्तीतील सहजता ही आशयाच्या सौंदर्याला वृद्धिंगत करणारी ठरते.
ओठ शिवण्याचे कुठे शिकलीस पोरी
तू न फुलता का अशी मिटलीस पोरी
नवऋतू येता कळीचे फूल झाले
पाहुनी ते खिन्न का हसलीस पोरी
तान्हुल्या ओठी दुधाचे थेंब देण्या
आटवूनी रक्त तू झीजालीस पोरी
भाकरीची भूक जेव्हा आग झाली
मूक तू खिडकीतही बसलीस पोरी
संगीता जोशी यांचे आतापर्यंत 'म्युझिका', 'वेदना-संवेदना','चांदणे उन्हातले' हे गझल संग्रह आणि 'मानस' व 'स्किझॉस' हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या गझलेला पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज,सुरेश भट यासारख्या दिग्गजांची प्रशंसा लाभली आहे. अमरावती येथे झालेल्या तिस-या अ.भा. मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले आहे. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कवयित्री आहेत. मराठी आणि उर्दुचा त्यांचा चांगला अभ्यास असून गझल लेखन वाढीस लागावे यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर स्वतंत्र मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतल्या आहेत. जबलपूर येथून प्रकाशित झालेल्या भारत आणि पाकिस्तानातील कवयित्रींच्या उर्दू गझलांचा समावेश असलेल्या 'गुलमोहर' या प्रातिनिधिक गझलसंग्रहामध्ये संगीता जोशींच्या दोन गझलांचा समावेश करून त्यांच्या गझल लेखनातील योगदानाची योग्य ती दाखल घेण्यात आली आहे. जीवनाप्रती अपार प्रेम,आशावाद त्यांच्या गझलेतून व्यक्त होतो.
हारण्यास एक नवा डाव पाहिजे
साकळे जुना नवीन घाव पाहिजे
फत्तरासही फुटू शकेल पालवी
आसवात एवढा प्रभाव पाहिजे
अंधकार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतिचा उठाव पाहिजे
दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे
समकालीन सामाजिक वास्तवावर त्यांनी आपल्या गझलेच्या माध्यमातून प्रभावी भाष्य केले आहे. जीवनातील सुखाइतकेच दु:खावरही प्रेम करण्याची उदात्त भावना ही गझलेच्या स्वाभाविकतांपैकी एक आहे. म्हणून हा नकारात्मकतेकडे नेणारा काव्यप्रकार नसून एक सकारात्मक दृष्टी देण्याची ताकद असलेला काव्यप्रकार आहे. संगीता जोशी यांच्या गझलेमधील शब्दसौंदर्य,अभिव्यक्तीमधील स्पष्टता, शब्दांमधील सहजता, अचूक व प्रभावी शब्दयोजन,तांत्रिक निकषांचे अचूक पालन यामुळे त्यांची गझल रसिक वाचकांच्या मनात घर करून राहिली आहे.
पूर्व प्रकाशन 'साक्षात'(एप्रिल,मे,जून २०१२)
------by Adv.Amol A. Waghmare,
Aurangabad (Maharashtra, India)
amolwaghmare001@gmail.com
सुंदर विवेचन! मी खरं तर संगीता जोशींच्या गझला वाचून गझल शिकलो आणि नंतर भटांच्या गझला वाचल्या. दोघांची शैली खूप वेगळी आणि सुंदर आहे. तुम्ही उदाहरणंही चपखल दिली आहेत.
ReplyDelete